लोकशाहीचा चौथा स्तंभ आणि आधुनिक पत्रकारिता



लोकशाहीचा चौथा स्तंभ आणि आधुनिक पत्रकारिता


दिनांक : 20/12/2025

ठिकाण : हिंदी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर .

शिवाजी विद्यापीठाच्या हिंदी विभागामध्ये 'पीएम उषा' (PM-USHA) योजनेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या 'व्हॅल्यू ॲडेड कोर्स ऑन कंटेंट रायटिंग फॉर मीडिया' या कार्यशाळेचा समारोप आज उत्साहात पार पडला. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी माध्यम क्षेत्रातील बदलत्या प्रवाहांचे आणि नैतिक जबाबदाऱ्यांचे एक महत्त्वाचे मंथन ठरले. या समारोप समारंभासाठी मास कम्युनिकेशन विभागाचे विभागप्रमुख डॉ. शिवाजीराव जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते,  कार्यक्रमाचे अध्यक्षपद प्रोफेसर डॉ. तृप्ती करेकट्टी यांनी भूषवले. या संपूर्ण कार्यशाळेचे नियोजन आणि संयोजन हिंदी विभागाचे डॉ. जयसिंग कांबळे सर यांनी केले होते. अविनाश कांबळे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

डॉ. शिवाजीराव जाधव यांनी आपल्या मार्गदर्शनात पत्रकारितेच्या गौरवशाली इतिहासाला उजाळा दिला. त्यांनी सांगितले की, भारतातील पत्रकारितेचा पाया संघर्षातून रचला गेला आहे. जेम्स ऑगस्टस हिकी यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेला दिलेल्या आव्हानापासून ते बाळशास्त्री जांभेकर आणि राजर्षी शाहू महाराज यांनी समाजप्रबोधनासाठी केलेल्या संघर्षापर्यंतचा प्रवास आजही पत्रकारांसाठी प्रेरणादायी आहे. मात्र, १९८०-९० च्या दशकानंतर जागतिकीकरणामुळे माध्यम क्षेत्रात मोठे बदल झाले असून, आज पत्रकारितेवर मोठ्या कॉर्पोरेट हाऊसेसची आणि भांडवलदारांची पकड घट्ट झाली आहे. लोकशाही मूल्यांपेक्षा नफा कमावणे हाच मुख्य उद्देश बनत चालला आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

सध्याच्या 'माहिती प्रदूषणाच्या' काळात 'फेक न्यूज' आणि सोशल मीडियाचा वाढता प्रभाव ही लोकशाहीसमोरील मोठी आव्हाने आहेत. केवळ चटपटीत बातम्यांना पसंती देण्याऐवजी, वाचकांनी माहितीची पडताळणी करणे आणि 'द हिंदू', 'इंडियन एक्सप्रेस' किंवा 'अल्ट न्यूज' यांसारख्या विश्वासार्ह पर्यायी माध्यमांची कास धरणे गरजेचे आहे, असे मत या कार्यशाळेतून मांडण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी श्रीकांत देसाई सर यांनी उपस्थित सर्व मान्यवर आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना केवळ मजकूर लेखनाचे कौशल्यच मिळाले नाही, तर भविष्यात जबाबदार पत्रकार म्हणून काम करण्याची दृष्टीही मिळाली.समाजातील विविध अनुभव आणि पदवीबद्दल गर्दीत मिळालेली पदवी या लेखात विस्ताराने लिखाण आहे.





Comments

Popular posts from this blog

मनुच्या अंधारातून भीमाच्या प्रकाशाकडे नेणारी कविता

हिंदी राष्ट्रभाषा या राजभाषा - सौरभ कांबले